चालू घडामोडी (9 जुलै 2022)
गर्भपात हक्क संरक्षण आदेशावर बायडेन यांची स्वाक्षरी :
- गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश असलेल्या गर्भपाताशी संबंधित कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली.
- दोन आठवडय़ांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपुष्टात आणल्यानंतर बायडेन यांनी महिलांच्या हक्क संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, यासाठी त्यांच्या सहकारी डेमोक्रॅट्सनी त्यांच्यावर दबाव आणला होता.
- आरोग्य या संवेदनशील विषयाशी संबंधित माहितीचे हस्तांतरण आणि विक्री, पुनरुत्पादन आरोग्य सेवेशी संबंधित ऑनलाइन पाळतीशी सामना आणि रुग्णांच्या गोपनीयतेचे संरक्षण हा बायडेन यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशाचा उद्देश आहे.
- महिलांनी गर्भपात केलाच तर संभाव्य दंडाची रक्कम कमी करण्याचा या आदेशाचा आणखी एक उद्देश असला तरी गर्भपाताच्या महिलांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची अध्यक्ष म्हणून त्यांची अधिकार कक्षा मर्यादित असल्याचे सांगण्यात येते.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या :
- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झालं आहे.
- आबे हे एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला.
- तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली.
- पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 67 वर्षीय आबे यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती.
नागपूरच्या अधिकाऱ्याचा दिल्लीत सन्मान :
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर विभागाचे प्रकल्प संचालक व महाप्रबंधक (तांत्रिक) एन.एल. येवतकर यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार 2021’ ने गौरवण्यात आले.
- दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येवतकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- नागपूर-रायपूर (महामार्ग क्र. 53) मार्गावरील साकोली व लाखनी येथील उड्डाण पुलाच्या उत्कृष्ट बांधणीसाठी हा पुरस्कार येवतेकर यांना देण्यात आला.
- तर कोलीतील उड्डाण पुल 28.2 मीटर ‘स्पॅन’ एका पिल्लरवर आहे. अशाप्रकारचे काम भारतात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
- तसेच पुलावरील पाणी जमिनीत मुरवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धात भारताचा पराभव :
- गोल करण्याच्या नामी संधी वाया दवडल्यामुळे भारताने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेमधील न्यूझीलंडविरुद्धच्या ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात 3-4 असा पराभव पत्करला.
- परंतु गटसाखळीत तिसरे स्थान मिळवणाऱ्या भारताला अन्य गटातील स्पेनविरुद्ध विजय मिळवता आल्यास उपांत्यपूर्व फेरी गाठता येऊ शकते.
- ब-गटात न्यूझीलंडने 7 गुणांसह अग्रस्थान आणि इंग्लंडने 4 गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
- तर प्रत्येकी दोन गुण खात्यावर असले तरी भारताने सरस गोलफरकाआधारे तिसरे स्थान मिळवले.
- अखेरच्या स्थानावरील चीनचे आव्हान संपुष्टात आले.
दिनविशेष :
- शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होवे’ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता.
- सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता.
- 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली.