चालू घडामोडी (13 जुलै 2022)
जागतिक पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा :
- जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे आपला राजीनामा सादर केला.
- अमेरिकेत प्रदीर्घ अध्ययन रजा मंजुरीच्या मुद्यावर डिसले हे वादग्रस्त ठरले असून त्याबाबत झालेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे.
- ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत क्यूआर कोड शिक्षण प्रणाली विकसित करून जागतिक पातळीवर पोहोचलेले आणि डिसेंबर 2020 मध्ये युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशनचा सात कोटी रुपयांचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले हे प्रकाशझोतात आले होते.
- नंतर अमेरिकेतील फुलब्राईट अभ्यासवृत्ती डिसले यांना जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती.
- परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्याबाबतची रीतसर कागदपत्रे डिसले यांच्याकडे मागणी करूनही शेवटपर्यंत त्यांनी सादर केली नव्हती. .
- दरम्यान, जागतिक शिक्षक पुरस्कार मिळण्यापूर्वी डिसले यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते.
- मात्र ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत रुजू झाल्याची नोंद कोठेही आढळून आली नाही.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टीपलेले अंतराळाचे पहिले रंगीत छायाचित्र नासाकडून प्रसिद्ध :
- अमेरिकन अंतराळ संस्था नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेले विश्वाचे पहिले रंगीत छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे छायाचित्र प्रसिद्ध केले.
- तर 13 अब्ज वर्षांपूर्वीच्या बिग बॅंगनंतर तयार झालेल्या विश्वाचे हे पहिले रंगीत छायाचित्र आहे.
- यावेळी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आजचा दिवस हा विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले.
- जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली दुर्बिणीने विश्वाच्या इतिहासात अंतराळाचे एक नवीन छायाचित्र दिले आहे.
राज्य मानांकन कॅरम स्पर्धात प्रशांत, काजलला जेतेपद :
- विश्वविजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरे आणि काजल कुमारी यांनी बंगाल क्लबतर्फे आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे जेतेपद मिळवले.
- पुरुष एकेरीत प्रशांतने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विकास धारियाला नमवले.
- दोन सेटच्या बरोबरीनंतर तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली.
- सातव्या बोर्डनंतर 19-14 अशी 5 गुणांची आघाडी प्रशांतकडे होती. त्याने आपली हीच लय कायम ठेवत विजय नोंदवला.
- दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम लढतीत काजलने मुंबईच्या नीलम घोडकेवर 25-6, 22-11 असा एकतर्फी विजय मिळवला.
रोहितने ख्रिस गेल आणि आफ्रिदीलाही टाकले मागे :
- ओव्हल क्रिकेट स्टेडयमवरती झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली.
- कर्णधार रोहित शर्माने नाबाद 76 धावांची खेळी करून भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
- आपल्या अर्धशतकादरम्यान त्याने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले. अशी कामगिरी करून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 षटकांरांचा टप्पा पार केला.
रोहितने आपल्या फलंदाजीदरम्यान मारलेल्या षटकारांच्या जोरावर शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडला. - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 259 डावांमध्ये 250 षटकार मारले होते. तर, वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने 268 डावांमध्ये हा टप्पा पार केला होता.
- रोहित शर्माने मात्र, केवळ 224 डावांमध्येच 250 षटकार पूर्ण केले. त्यामुळे रोहित शर्मा सर्वात कमी डावात 250 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर हा नवा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.
दिनविशेष :
- 13 जुलै 1660 मध्ये पावनखिंड लढवून ‘बाजीप्रभू देशपांडे‘ यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
- 1908 या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी मिळाली.
- जतिंद्रनाथ दास यांनी १९२९ मध्ये लाहोर तुरुंगने उपोषण सुरू केले केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.